मुंबई :उद्या ६ मे रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह हजारो बारसू प्रकल्प समर्थक हे बारसूत मोर्चा काढणार आहेत. एकीकडे बारसू रिफायनरीवरून राजकारण तापले असताना दुसरीकडे बारसूच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघणार असल्याने सर्वांचे लक्ष या मोर्चाकडे लागलेले आहे. उद्धव ठाकरे हे सुद्धा उद्या बारसूत येत असल्याकारणाने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकल्प समर्थनांचा मोर्चा :बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात उद्या मोठ्या प्रमाणामध्ये बारसूत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थना मध्ये हा मोर्चा निघणार असून यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री, रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह हजारो समर्थक सहभागी होणार आहेत.
या मोर्चा विषयी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, बारसू येथे रिफायनरीला होणारा विरोध हा फक्त एकतर्फी दाखवला जात आहे. ठाकरे कुटुंब सातत्याने कोकणाच्या विकासाच्या आड येत असून उद्धव ठाकरे यांनी फक्त कोकणातील प्रकल्पांना विरोध करून तिजोरी भरण्याचं काम केलं आहे. जेव्हा जेव्हा कोकणातील लोकांना रोजगार मिळणार असतो तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे यांची वसुली गॅंग तिथे येते. बारसू रिफायनरी बाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण केले गेले आहेत. ते दूर करण्यासाठी आम्ही बारसूमध्ये प्रकल्पाच्या समर्थनामध्ये असलेल्या लोकांचा मोर्चा काढत आहोत, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.