मुंबई Nirav Modi PNB Scam : पंजाब बँकेला चुना लाऊन 11 हजार 400 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून फरार झालेल्या आरोपी निरव मोदीला न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. निरव मोदीची 71 कोटी रुपयांची संपत्ती आता जप्त करण्याचा निर्णय मुंबईच्या पीएमएलए विशेष न्यायालयानं दिलेला आहे. 22 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयाचं न्यायाधीश एस एम मेंजोगे यांनी याबाबतचा निर्णय दिला.
संपत्ती जप्त करा, पी एम एल न्यायालयाचा निर्णय :निरव मोदी आणि मेहुल चौकशी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेतील जनतेचा पैसा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करून पळवला. त्यानंतर त्यांना फरार म्हणून घोषित केलं आहे. या दोघांवर आरोपपत्र देखील दाखल झालं आहे. निरव मोदीची 500 कोटी रुपयांची संपत्ती आतापर्यंत जप्त केलेलीच आहे. परंतु त्यात आता नव्यानं 71 कोटी रुपयांची भर पडणार आहे. ही संपत्ती जप्त करण्याबाबत पंजाब नॅशनल बँकेची मागणी पीएमएलए न्यायालयानं मान्य केलेली आहे. संपत्ती जप्त करण्याबाबतचे आदेश न्यायालयानं जारी केले आहेत.
जप्ती संपत्तीत आहेत महागड्या गाड्या :निरव मोदी याच्या आताच्या 71 कोटी रुपयांच्या संपत्ती जप्तीमध्ये त्याच्या कुर्ल्यातील कार्यालयाची जागा देखील आहे. त्याच ठिकाणी तळघरात सुमारे 24 कोटी 6 लाख रुपये किमतीची जागा देखील आहे. तसेच 9 लाख 80 हजार रुपयाच्या कारसह इतर आठ वाहनांचा समावेश आहे. यात फोर्स मोटर ट्रॅव्हलर अल्टो तसेच फोर सीजन हॉटेलमध्ये 35 लाख 50 हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याशिवाय दुबई आणि हाँगकाँग इथून त्यानं आणलेल्या मौल्यवान वस्तूंचा समावेश देखील आहे. त्याची किंमत चाळीस कोटी रुपये पेक्षा अधिक आहे.
काय होता ईडीचा युक्तिवाद :यासंदर्भात ईडीनं सुनावणी दरम्यान भूमिका मांडली," निरव मोदी यानं काही नियंत्रित कंपन्यांच्या द्वारे पंजाब नॅशनल बँकेचे 7 हजार 29 कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेची फसवणूक केलेली आहे. ईडीच्या दाव्यानंतर न्यायाधीश एस एम मेंजोगे यांनी पंजाब नॅशनल बँकेची विनंती मान्य करत 71 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेला दिलासा मिळाला.
काय आहे 11,400 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण :निरव मोदी यानं पंजाब नॅशनल बँकेचे 11 हजार 400 कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार करून पैसे लंपास केल्याचा आरोप बँकेनं केला होता. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं तक्रार दाखल केली होती. पंजाब नॅशनल बँकेनं 280 कोटी रुपयांचं नुकसान निरव मोदीमुळे झाल्याचा दावा केला आहे. या संदर्भात 2018 मध्ये तपास यंत्रणांनी निरव मोदी आणि इतर 25 व्यक्तीविरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं आहे.
प्रत्यार्पणानंतर निरव मोदी येईल ताब्यात : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावून निरव मोदी पळून गेलेला आहे. त्याचा हिऱ्यांचा व्यापार असून तो सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारत सरकार प्रत्यार्पणाची कारवाई करत आहे. पाच वर्षापासून निरव मोदी हा फरार आहे. इंग्लंडमधील न्यायालयानं निरव मोदी विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर तिथल्या पोलिसांनी दोन दिवसात त्याला ताब्यात देखील घेतलं होतं.
हेही वाचा :
- G20 summit : जी-२० शिखर परिषदेत फारारी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणावर भारताचा भर
- निरव मोदीला भारतात आणल्यास, 'या' कारागृहात ठेवण्यात येणार
- नीरव मोदीला उच्च न्यायालयाचा दणका, मुलाची याचिका फेटाळली