महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांसाठी खुषखबर..! नववी, अकरावीची परीक्षा होणार रद्द, मूल्यमापन करून गुण देण्याचा प्रस्ताव - Minister Varsha Gaikwad news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. तर कोरोनाचा विळखा वाढतच चालल्याने इयत्ता नववी आणि अकरावीच्या परिक्षा रद्द करण्यात याव्यात आणि मुल्यमापन पद्धतीने गुण द्यावे, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दिला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 12, 2020, 1:55 PM IST

मुंबई - नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द केली जाणार आहे. यासाठीचा अत्यंत महत्वाचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या प्रस्तावावर येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. नववी आणि आणि अकरावीची परीक्षा ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने ही परीक्षा घेऊ नये, अशा स्वरूपाचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार करून तो शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवला आहे.

या प्रस्तावामध्ये नववी आणि अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय आणि शाळास्तरावर त्या-त्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन आणि वर्षभरातील प्रगती लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत आणि त्यांचा निकाल जाहीर केला जावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम शिकवण्याचे तास हे पूर्ण झाले असून केवळ परीक्षा राहिल्या होत्या.

तर काही ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे सुरू होते. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षेसाठी बोलवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत त्या रद्द करून त्यासाठी सरसकट मूल्यमापन पद्धत अवलंबावी आणि विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत, अशी शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. हा प्रस्ताव रात्री उशिरा शालेय शिक्षण मंत्र्यांकडे देण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.

राज्यात नववीच्या वर्गात सुमारे १७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तर अकरावीच्या वर्गात ही संख्या तब्बल १२ लाखांहून अधिक असते. या दोन्ही वर्गातील परीक्षा घेण्याची जबाबदारी ही संबंधित शाळा आणि महाविद्यालयांवर असते त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांनी या परीक्षेच्या संदर्भात तातडीने मूल्यमापन करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने सूचना द्याव्यात अशीही शिफारस या प्रस्तावामध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा -कोरोना संकटातील योद्धा; भारतीय रेल्वेचे सिग्नल अॅन्ड टेलिकॉम तंत्रज्ञ

ABOUT THE AUTHOR

...view details