मुंबईNilam Gorhe on Sushma Andhare : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषद सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक त्यांनी एकत्र येत सभागृहाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यास कोणाचं दुमत नसल्याचं एकमत झालं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप केलाय. यावर भाजपा आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्यांच्यावर हक्क भंग आणावा अशी मागणी सभागृहात केली. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यासाठी वेळ दिलाय. जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याची परवानगी प्रवीण दरेकर यांना दिली जाईल, असं विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितलं.
सभागृहाचा केला अवमान : यावेळी बोलताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, नीलम गोऱ्हे ह्या आपल्या सदनाच्या उपसभापती असून रवींद्र धंगेकर हे खालील सभागृहाचे सदस्य असताना आरोप केले आहेत. त्यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्याबाबत आक्षेप नोंदवायला हवा होता. मात्र तसं न करता त्यांनी उपसभापतींवर आरोप केल्याने आपल्या सभागृहाचा अवमान केला आहे. त्यामुळं याची देखील दखल घ्यावी यासाठी आपण हक्क भंग दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, माझ्याकडे देखील कोणीतरी व्हिडिओ पाठवला आहे. त्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी आरोप केला आहे की, मी पक्षपातीपणा करते. खालच्या सभागृहातील सदस्याला मी कशी काय बोलायची परवानगी देणार असा प्रश्न देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केलाय. विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी मात्र थोडी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.