मुंबई -प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सुपूर्द केला होता. मात्र, आता हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला आहे. यानंतर एनआयएने हा तपास योग्य दिशेने करावा, अशी अपेक्षा अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांशी संवाद साधताना. विरोधकांची मागणी -
संशयित स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर हा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र राज्य सरकारकडून हा तपास एटीएसकडे सुपूर्द करण्यात आला होता.
हेही वाचा -मद्य महागणार; पाच टक्के मुल्यवर्धित करात वाढ
राज्य सरकारकडून एटीएस विभाग संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी करत असताना हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा तपास हा योग्य दिशेने व्हावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. यासोबतच सात महिन्यापूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणासंदर्भात देखील केंद्र सरकारने हस्तक्षेप करत, तो तपास सीबीआयला दिला होता. मात्र, अद्याप त्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. असाच प्रकार अंबानीच्या घराच्या बाहेर सापडलेल्या कार प्रकरणात होऊ नये, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद या प्रकरणात रंगण्याची दाट शक्यता आहे.