मुंबई -उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. यात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केल्यानंतर यामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींमध्ये प्रदीप शर्मा व सचिन वाझे हे दोघे यात कट रचणारे असू शकतात, अशा एनआयएच्या सूत्रांनी म्हटले आहे.
सचिन वाझे, मनसुख हिरेन, प्रदीप शर्मा यांचे लोकेशन एकाच ठिकाणी
सचिन वाझेसह, सुनील माने, नरेश गोर, विनायक शिंदे, रियाज काझी यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून, संशयाची सुई पहिल्या दिवसापासूनच प्रदीप शर्मा यांच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला होती. सुरुवातीला प्रदीप शर्मा यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात तब्बल सात चौकशी केली होती. या वेळेस त्याने सचिन वाझे यांच्या संपर्कात केव्हाही नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच्या उडवाउडवीच्या उत्तरांवर विश्वास न ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांचा तपास सुरू ठेवलेला होता. सचिन वाझे याने वापरलेल्या 12 मोबाईल सिम कार्डच्या सीडीआरवरुन तो प्रदीप शर्मा व हिरेन मनसुख यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलेले आहे. 4 मार्चला हिरेन मनसुख, सचिन वाझे व प्रदीप शर्मा यांचे लोकेशन हे मुंबईतील दाखवण्यात आलेला आहे. हे लोकेशन प्रदीप शर्मा यांच्या घराजवळ असल्याचे तपासाअंती समोर आले आहे.