NIA Arrest In Fake Currency Case : नौपाडा बनावट चलन प्रकरणात आणखी एकाला अटक, 12 धारदार तलवारी ताब्यात - NIA
नौपाडा बनावट चलन प्रकरणात एनआयएने आज आणखी एकाला अटक केली. एनआयएने आरोपी मो. फयाज शिकीलकर याच्याकडून 12 धारदार तलवारी आणि इतर गुन्हेगारी साहित्य ताब्यात घेतले आहे.
NIA
By
Published : May 13, 2023, 8:24 PM IST
मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी 2021 च्या नौपाडा बनावट चलन प्रकरणात आणखी एकाल अटक केली आहे. आता अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या तीन झाली आहे. एनआयएचे या प्रकरणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी छापे घालणे चालूच आहे.
आरोपी डी - कंपनीच्या संपर्कात होता : एनआयएने आरोपी मो. फयाज शिकीलकर याच्याकडून 12 धारदार तलवारी आणि इतर गुन्हेगारी साहित्य ताब्यात घेतले आहे. आरोपी उच्च दर्जाच्या बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) जप्त करण्यासंबंधीच्या खटल्याशी संबंधित आहे. एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, आरोपी बनावट नोटा चलनाच्या रॅकेटच्या संबंधात डी - कंपनीच्या संपर्कात होता.
दोन आरोपींची ओळख पटली : बुधवारी एनआयएने सहा ठिकाणी झडती घेतली होती. या झडतीचे धागे - दोरे 33 वर्षीय मुंबईतील रहिवासी मोहम्मद फयाजपर्यंत येऊन पोहचले. आरोपी आणि संशयितांच्या घरातून आणि कार्यालयातून जप्त केलेल्या काही सामग्रीच्या आधारे याला 2021 च्या प्रकरणाशी जोडले गेले आहे. सध्या आरोपी रियाझ आणि नासीर अशा दोन व्यक्तींची ओळख पटली आहे. हे दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये 2000 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा सापडल्या आहेत.
दोघांवर आरोपपत्र दाखल : ठाणे शहर पोलिसांनी मूळत: 18 नोव्हेंबर 2021 रोजी आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या हाय - प्रोफाइल प्रकरणात दोघांवर आरोपपत्र दाखल केले होते. हे एनआएएने आपल्या कक्षेत घेतले होते. 7 फेब्रुवारी 2023 रोजी RC - 01/2023/NIA/Mum) म्हणून पुन्हा नोंदणी केली होती.