मुंबई :शहर पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या कथित शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. मात्र ही सुनावणी 16 मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू होती.
काय आहे प्रकरण :कथित शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा आरोपी आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. आज या प्रकरणी न्यायालयाने 16 मे पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. सचिन वाझे सीबीआयच्या गुन्ह्यात माफिचा साक्षिदार बनला आहे. तर ईडीच्या प्रकरणातही सचिन वाझेने माफिचा साक्षिदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप :मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने मुंबईतील बार चालकाकडून 100 कोटी रुपयांची कथित वसुली केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटकही करण्यात आली होती. तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबतचा आरोप केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती.
परमबीर सिंहानी केला होता आरोप :तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्यात सचिन वाझेला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. मात्र या आरोपाचे अनिल देशमुख यांनी खंडण केले होते. याप्रकरणी अनिल देशमुख यांना कारागृहात जावे लागले. तर परमबीर सिंह यांचे निलंबन करण्यात आले होते.