मुंबई -राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. यामुळे राज्यात ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजना पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत असून विविध राज्यातून ऑक्सिजन आयात केले जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज व पुरवठ्याबाबत माहिती....
मुंबई
मुंबईसाठी दररोज 235 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सध्या ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. नव्याने 12 ठिकाणी 16 हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारले जात आहेत. मुंबईत दररोज 30 ते 50 हजार लसीकरण केले जाते. कालच (दि.25 एप्रिल) 1 लाख 58 हजार लसीचा पुरवठा झाला आहे. यामुळे पूढील तीन दिवस लसीकरण सुरू राहील. मुंबईत आतापर्यंत 22 लाख 37 हजार 283 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
नागपूर
नागपूर जिल्ह्यात साधारण 148 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, स्थानिक एमआयडीसी कंपन्यांकडून 78 मेट्रिक टनाची गरज भागवत आहे. काही प्रमाणात टँकर हे भिलाई येथून मागवले जात आहे. काल (दि. 25 एप्रिल) दिवसभरात 137 टन उपलब्ध झाले होते. 10 टनाची कमी अधिक प्रमाणात तूट आहे, जे दररोज सरासरी भरून काढण्यासह काही नवीन हवेतून ऑक्सजिन निर्मितीचा 13 टनचा प्लान्ट सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 638 लोकांचे लसीकरण पार पडले आहे. यात लसींचा साठा संपत आला असून सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पुन्हा 1 लाख 30 हजार वॅक्सिनचा ट्रक येणार आहे.
पुणे
जिल्ह्यात ऑक्सिजन 386.01 मेट्रिक टन मागणी असून पुरवठा 302.05 मेट्रिक टनचा होत आहे. मागणीच्या 22 टक्के साठा कमी आहे. एप्रिल महिन्यात 96 हजार 448 रेमडेसिवीरच्या व्हायल्स मिळाले होते. जिल्ह्यात 20 लाख 14 हजार 59 नागरिकांचे लसीकरण झाले असून 78 हजार 667 लसीकरणचा उपलब्ध साठा उपलब्ध आहे.
नाशिक
जिल्ह्यात 130 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून केवळ 85 मेट्रिक टन पुरवठा आहे. मागणीच्या 45 मेट्रिक टन कमी पुरवठा होत आहे. आतापर्यंत 6 लाख 20 हजार 957 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.