मुंबई -शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार की काय? अशी चर्चा राजकीय क्षेत्रात जोरात सुरू आहे. कारण, 'निवडणूकीमध्ये ज्या पक्षाने आमचा हात धरून विरोधी पक्षाविरोधात निवडणूक लढवली, तीच शिवसेना निवडणुकीनंतर मात्र विरोधकांचा हात धरून गेली. त्यामुळे आमच्यात आणि शिवसेनेत शत्रुत्व नाही. पण वैचारिक मतभेद आहेत', असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, 'आगामी काळात शिवसेनेसोबतच्या युतीबाबत काळ पाहून निर्णय घेऊ. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे आशिष शेलार यांच्यात झालेली भेट ही माझी मुलाखत घेण्यासाठीची तयारी झाली असावी', असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे शिवसेनेवर टीका करणारे फडणवीस अचानक कसे काय गोड बोलू लागले? असा सवाल उपस्थित झाला आहे.
आम्ही काय भारत पाकिस्तान नाही- संजय राऊत
फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनीही आपली भूमिका मांडली आहे. 'देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात, बातचीत होत असते. मात्र राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणवीस यांचे देखील हेच म्हणणे आहे. आपण पाहिले असेल आमिर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले, मात्र मित्र कायम आहेत. सेम आमचे तसेच आहे. रस्ते वेगळे आहेत, मात्र मैत्री कायम आहे. आमची मैत्री कायम राहिल. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आता काय आहे आणि उद्या काय असेल याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवले आहे, ते उत्तम सुरू आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.