नवी मुंबई -नवी मुंबई, पनवेल, उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या नवी मुंबई विमानतळावरून आता राजकारण पेटू लागले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई विमानतळाला कुणाचे नावे द्यावे? हा कळीचा मुद्दा बनला आहे. नवी मुंबई विमानतळासाठी परिसरात ज्या महान व्यक्तीमत्वाचे योगदान आहे, अशी किमान तीन ते चार नावे पुढे आली होती. मात्र सिडकोने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे घोषित केले. त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांनी या नावाला विरोध केला आहे. तसेच, या विमानतळला माजी खासदार, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असा आग्रह धरला आहे. मात्र दि. बा. पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते. बाळासाहेब ठाकरे हे दि. बा. पाटील यांचेही नेते आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव योग्य असल्याची भूमिका आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका
'नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे दि. बा. पाटील यांचे नाव प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे. तसेच किल्लेगावठाण चौकात दि. बा. पाटील यांचा पुतळा उभारावा. या ठिकाणच्या चौकाला हुतात्मा चौक हे नाव द्यावे. तसेच नवी मुंबईत अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. यातील एकाही प्रकल्पाला सिडकोने दि. बा. पाटील यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. नवी मुंबईत त्यांचे स्मरण होईल अशी भव्य वास्तू उभारण्यात यावी', अशी मागणी अखिल आगरी परिषदेने केली आहे.
विमानतळाला हिंदूह्रदयसम्राटांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर