मुंबई -राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या नवीन नियमावलीनुसार 11 जिल्ह्यांमध्ये अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. तर मुंबई आणि उपनगरात निर्बंधामध्ये शिथिलता आली असली तरी लोकल प्रवासाची मुभा मिळालेली नाही. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, तसेच हॉटेल व्यवसायिक आणि व्यापारी संघटनेकडून वेळ वाढवून देण्यात यावी यासंबंधीची मागणी होत आहे. उद्या (9 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री लोकल सेवेबाबतही दिलासा देतील, अशी शक्यता आहे. तसेच व्यापाऱ्यांनी वाढवून मागितलेली वेळ मुख्यमंत्री मान्य करतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन डोस घेणाऱ्यांसाठी लोकल सेवेची मागणी
मुंबईत निर्बंध शिथिल झाले असले तरी सामान्य मुंबईकरांना अद्यापही लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. लोकल सेवा सुरु केल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता राज्य सरकारकडून वर्तवली जाते आहे. मात्र लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनातरी लोकल सेवेची मुभा देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. तसेच दोन डोस घेणाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी विरोधकांनी देखील आंदोलनं सुरू केली आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल सेवा सामान्य नागरिकांना सुरू करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं जाहीर कार्यक्रमातून सांगितलं आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या टास्क फोर्टच्या बैठकीत काय निर्णय होतोय? याकडे लक्ष लागले आहे.
लीसचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासामध्ये मुभा?
दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासामध्ये मुभा मिळावी यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मिळालेले प्रमाणपत्र तपासणीसाठीही एक वेगळी यंत्रणा उभी करावी लागेल, यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे अद्याप तरी याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 'लोकल सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कधीही स्पष्ट सांगितले नाही. मात्र, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे नेहमीच मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. लोकल सेवा सुरू केल्यास रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या वाढू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे', असे यापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले.