मुंबई New Year २०२४ Celebratration :नवीन वर्षाचं स्वागत आणि त्यालाच लागून सुट्ट्या आल्यानं सध्या मुंबईकर कोकण, गोवा अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेले आहेत. (new year plan) असं असलं तरी मुंबईत देखील नव्या वर्षाच्या स्वागताचा माहोल हा जोरातच असतो. मुंबईत थर्टी फर्स्ट कुठे एन्जॉय करता येईल याची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे.
गेट वे ऑफ इंडिया, वरळी सी लिंक आणि इतर :तुम्हाला नवीन वर्षाच्या निमित्ताने फक्त फोटोशूट करायचं असेल आणि त्यात आकर्षक रोषणाई हवी असेल तर आम्ही आता जी तुम्हाला ठिकाणं सांगतोय ती परफेक्ट स्पॉट आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संध्याकाळच्या वेळेत तुम्ही इथे गेल्यास तुम्हाला फोटोशूटसाठी हा एक परफेक्ट स्पॉट मिळेल. दुसरं म्हणजे वरळी सी लिंक. याला देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, येथे फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते. त्यामुळे तुम्हाला फक्त फोटो काढून सेलिब्रेशन करायचं असेल तर इथे जाऊ शकता. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मंत्रालय अशा शासकीय इमारतींना देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गार्डन, बीच, चौपाट्या :नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शांत निसर्गरम्य वातावरण, समोर खवळलेला समुद्र आणि भेळ किंवा शेवपुरी असं कॉम्बिनेशन तुमच्या नजरेत शोधत असाल तर मुंबईतले बीच चौपाटी आणि गार्डन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील गार्डन तसेच चौपाट्यांवर देखील विशेष तयारी करण्यात आली आहे. इथे देखील विद्युत रोषणाई, फूड स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा प्रियजनांसोबत अशा एखाद्या स्पॉटच्या शोधात असाल तर दादर, वांद्रे आणि मलबार हिल तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे.