मुंबई- मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर शनिवार 14 डिसेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात पहिली कसारा-सीएसएमटी लोकल 34 मिनिटे अगोदर सुटणार आहे. तर उर्वरित लोकलच्या 42 फेऱ्यांच्या वेळात 5 मिनिटांनी बदल करण्यात आला आहे.
बदलेल्या वेळेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होणार आहे. परेल लोकलच्या संख्येत 3 ने वाढ करण्यात आल्यामुळे परेल लोकलची संख्या आता 38 झाली असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'नाल्यांमध्ये जाणारा कचरा रोखण्यासाठी झोपडपट्टीतील गटारांवर जाळ्या बसवा'
मध्य रेल्वेवर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवीन वेळापत्रक लागू होते. मात्र, यंदा वेळापत्रकास काहीसा विलंब झाला आहे. या नवीन वेळापत्रकात लोकलच्या फेऱ्या वाढविण्यावर भर न देता लोकलच्या वेळात बदल करुन वेळापत्रकाचा वक्तशीरपणा सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. वेळा बदलण्यात आलेल्या लोकलमध्ये कल्याण, कर्जत, टिटवाळा, खोपाली, ठाणे लोकलचा समावेश असल्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.