मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची फौज मुंबई महापालिकेत पाठवली. या अधिकाऱ्यांनी कोणती कामे करायची हे निश्चित नव्हते. मात्र, नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या 8 आयएएस अधिकाऱ्यांना आपली कामे वाटून दिली आहेत. तसे परिपत्रकच आयुक्तांनी काढले आहे. या परिपत्रकानुसार रुग्णालयांचे नियंत्रण, उपचार, ट्रेसिंग, लॉकडाऊन शिथील झाल्यास उपाययोजना, गरजूंना होणार्या खाद्य वाटपाबरोबरच पालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणार्या सर्व सेवा-सुविधांचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या रोखण्याचे काम आणखी प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारने पालिका आयुक्तांसह 8 आयएएस अधिकारी पालिकेत पाठवले आहेत. त्यापैकी पालिकेच्या सात झोनमध्ये सात सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्यांना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दहा दिवसांवरून वीस दिवसांवर आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यानंतर आता कोरोना रोखण्यासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकार्यांवर कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आयएएस मनीषा म्हैसकर यांच्याकडे रुग्णालयांतील बेडची व्यवस्था पाहणे, सर्व रुणालयांच्या डीनकडून आढावा घेणे, समन्वयासाठी गट तयार करून काम करावे लागणार आहे. सर्व रुग्णालयांचे अधिष्ठाता म्हैसकर यांना दररोज आपला अहवाल देतील.
आयएएस अश्विनी भिडे या पालिकेच्या वॉर रूमचे मॉनिटरिंग करतील. शिवाय काँटॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाईन, कोव्हिड-19 सेंटर आणि प्रतिबंधित क्षेत्रांचे व्यवस्थापनासंबधातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून काम करतील.
आयएएस संजीव जयस्वाल यांच्यावर गरजूंना होणार्या खाद्यवाटपासह स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याबाबत राज्य सरकारशी समन्वय, त्यांचे प्रश्न, राज्य शासनाच्या निर्देशानुसार याबाबत येणार्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असेल. शिवाय लॉकडाऊन शिथील झाल्यास त्याची मुंबईत अंमलबजावणी कशी करायची या संदर्भात पॉलिसी बनवण्याचेही काम जयस्वाल यांच्यावर असेल.