मुंबई- राज्यात नवीन वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात दिली. राज्याचे सहावे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान भवनातील अधिकारी आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अभिवादन केले. त्यावेळी अजित पवार यांनी ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे राज्यात होते. कालपासून चर्चा सुरू होती. आता आमची पाच लोकांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यात माझ्यासह धनंजय मुंडे, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक हे आहेत. ही समिती काँग्रेसबरोबर चर्चा करून त्यात साधारण सर्वसमावेशक असा कार्यक्रम ठरेल, आणि त्यातून चर्चा केल्यानंतर त्यात एकवाक्यता झाल्यानंतर ते वरिष्ठांच्या कानावर घालून पुढील दिशा ठरेल, असे अजित पवार यांनी सांगितले.