मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona Virus) विस्फोट पाहायला मिळत आहे. राज्यात आज (31 डिसेंबर) तब्बल 8 हजार 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत 5 हजार 428 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Corona Patients)झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग आता दुपटीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी 5 हजार 300 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज एका दिवसात ही संख्या जवळपास साडे आठ हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
- राज्यात आज ओमायक्रॉनचे चार रुग्ण -
राज्यात आज चार ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Cases in State) आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) रिपोर्ट केलेले आहेत. वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे.
- राज्यात ८ हजार ६७ नवीन कोरोनाबाधित -
आज दिवसभरात राज्यात ८ हजार ६७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात आज १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक, ४१२ नवीन बाधितांची नोंद -
राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ (Pune Corona Cases) होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron Cases) वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज (31 डिसेंबर) 412 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक मोठी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आज झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.