मुंबई -मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) नव्या डब्यात आणि नव्या रंगात धावणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मधून नव्या डेक्कन क्वीनच्या १६ डबे मुंबईत मागील महिन्यात दाखल झाले आहे. मात्र, डायनिंग कोच अद्यापही मुंबईत दाखल न झाल्यामुळे मुंबई-पुणेचा प्रवाशांना नव्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
केव्हा येणार डायनिंग कोच -रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक रेल्वे ,असा मान मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला आहे. या गाडीला चाकरमानी दख्खनची राणी म्हणून संबोधतात. जून, 1930 पासून डेक्कन क्वीन ही रेल्वे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार आहे. दोन वर्षांपूर्वी या दख्खनची राणीला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे लावण्याची योजना रेल्वेने आखली होती. मात्र, डायनिंग डब्यामुळे एलएचबी डबे जोडण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. आता या अडचणींवर मात करून एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला भारतीय रेल्वेमधील एलएचबी डायनिंग कार असलेल्या पहिल्या रेल्वेचा मान मिळणार आहे. सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF )मधून डेक्कन क्वीनचे १६ डबे मुंबईत दाखल झाले आहे. येत्या काही दिवसांत चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मधून डायनिंग कोच मुंबई येणार आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे दरम्यान नवीन डेक्कन क्वीन धावणार आहे.