महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत बोगस लसीकरण टाळण्यासाठी महापालिकेची नवी नियमावली - मुंबईत बोगस लसीकरण

बोगस लसीकरणाचे प्रकार मुंबईत अनेक ठिकाणी झाल्याचे समोर आल्याने त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी नियमावली बनवली आहे. खासगी सोसायटींना आणि आस्थापनांना नोंदणीकृत लसीकरण केंद्राकडून लसीकरण करावे लागणार आहे. त्याची नोंद केंद्र सरकारच्या कोविन ऍपवर करावी. असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

New BMC regulations to prevent bogus vaccination in Mumbai
मुंबईत बोगस लसीकरण टाळण्यासाठी महापालिकेची नविन नियमावली

By

Published : Jul 2, 2021, 2:26 PM IST

मुंबई - कांदिवली येथे बोगस लसीकरण झाल्याचा प्रकार उघड झाला होता. बोगस लसीकरणाचे प्रकार मुंबईत अनेक ठिकाणी झाल्याचे समोर आल्याने त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी नियमावली बनवली आहे. खासगी सोसायटींना आणि आस्थापनांना नोंदणीकृत लसीकरण केंद्राकडून लसीकरण करावे लागणार आहे. त्याची नोंद केंद्र सरकारच्या कोविन ऍपवर करावी. असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. तसेच अशा लसीकरण केंद्रांवर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती -

मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीतील 390 लोकांचे बोगस लसीकरण झाले होते. असाच प्रकार इतर ठिकाणी झाला असून 2 हजारहून अधिक नागरिकांचे बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. याची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यानंतर पालिकेने बोगस लसीकरणाचे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी खासगी सोसायटी आणि आस्थापनांना पालिका व केंद्र सरकारकडे नोंद असलेल्या खासगी लसीकरण केंद्राकडूनच लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करण्याआधी संबंधित केंद्र नोंदणीकृत आहे. अशी माहिती खासगी आस्थापनांमधील व्यवस्थापनाला तसेच सोसायटीतील सेक्रेटरींना पालिकेला द्यावी लागणार आहे. सोसायटीच्या सेक्रेटरी आणि खासगी आस्थापनांना नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्याला लसीकरण करण्यासाठी लागणारे मनुष्य बळ तसेच आयटी सेवा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. असे परिपत्रकात म्हटले आहे.

नोडल अधिकाऱ्याला अशी करावी लागणार कार्यवाही -

नोडल अधिकाऱ्याला लसीकरण केंद्र कोविन ऍपवर नोंद असल्याची खात्री करावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर्डमधील आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरणाची माहिती द्यावी लागणार आहे. सोसायटी आणि लसीकरण केंद्रामध्ये करार करावा लागणार आहे. सोसायटीच्या कमिटी मीटिंगमध्ये लसीकरणाची तारीख आणि वेळ मंजूर करून घ्यावा. सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लसीकरणाची माहिती, लसीकरण करणाऱ्या केंद्राची माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे. स्थानिक पोलीस स्टेशन तसेच पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लसीकरणापूर्वी 3 दिवस आधी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व लाभार्थ्यांना लसीकरणानंतर प्रमाणपत्र देण्याबाबतच्या लिंक मिळाली की नाही हे पाहावे लागणार आहे.

आरोग्य अधिकारी करणार तपासणी -

खासगी आस्थापना तसेच सोसायटीमध्ये लसीकरण करताना देण्यात आलेल्या माहितीची वॉर्ड मधील आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहे. ज्या लसीकरण केंद्र आणि सोसायटीमध्ये करार झाला आहे का याची तपासणी होणार आहे. तसेच खासगी ठिकाणी होणाऱ्या लसीकरणाच्या ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी भेटी देऊन तपासणी करणार आहेत. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - कांदिवलीतील बोगस लसीकरणाचा होणार खुलासा; सिरमकडून मिळालेली माहिती महापालिका पोलिसांना देणार

ABOUT THE AUTHOR

...view details