मुंबई -कोरोनावर मात केलेल्या अनेक जणांचा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात असे मृत्यू टाळण्यासाठी पोस्ट कोविड सेंटर उभारावेत, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
आज विधान परिषदेत शोक प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही मागणी केली. विधान परिषदेचे माजी सदस्य पुंडलिकराव पाटील यांनी कोरोनावर मात केली. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या इतर आजारांमुळे त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे देखील असेच निधन झाले. या दोघांनी कोरोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर इतर आजारामुळे त्यांचे निधन झाले. राज्यात असे मृत्यू टाळण्यासाठी पोस्ट कोविड सेंटरची आवश्यकता असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
पोस्ट कोविड सेंटरमध्ये रुग्णांना 10 दिवस ठेवण्यात यावे
या पोस्ट कोविड सेंटरमध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची देखभाल तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोनावर मात केलेला रुग्ण 8 ते 10 दिवसांसाठी पोस्ट कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात यावा. त्याची डॉक्टरांकडून नियमीत तपासणी करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. विधान परिषदेत संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व विधान परिषदेचे माजी सदस्य राम प्रधान, विधानपरिषद सदस्य पुंडलिक पाटील तसेच माजी विधान परिषद सदस्य व माजी राज्यमंत्री संदेश कोंडविलकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला होता. त्यावर बोलताना भुजबळ यांनी राम प्रधान यांच्यासारख्या अधिकारी पुन्हा हवा अशी भावना व्यक्त केली.