मुंबई : कोरोनाच्या महासंकटाशी राज्य सरकार झुंज देत असतानाच आगामी मान्सून आणि निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून कुठलीही जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(सोमवारी) सांगितले.
आज(सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाउडस्पीकर द्वारे सांगण्यात आले असल्याचे सांगितले. यासाठी पक्की निवारा गृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आले असून तटरक्षक दलाला देखील सुचना देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाउस यामुळे हानी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत.