मुंबई - भारतीय संविधानाची शालेय जीवनातच ओळख व्हावी तसेच विद्यार्थी दशेपासूनच प्रत्येकाला संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधानातील काही महत्त्वाचे लेख संक्षिप्त स्वरुपात पाठ्यक्रमात समाविष्ट करावेत, तसेच संविधान हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेशच्या वतीने नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे आदी नेत्यांना सादर करण्यात आले.
या निवेदनाची सरकारने सकारात्मक दखल घेऊन लवकरात लवकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असून चर्चेत काही संबंधित अधिकारीही सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्नेहल कांबळे यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांवर संवैधानिक संस्कार होण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये संविधान प्रास्ताविक वाचण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.