मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावले. आयएल अँड एफएस कंपनीने अनेकांना कर्ज दिले होते. या कर्जामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जयंत पाटील यांचे नाव समोर आले. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना हजर राहायचे आदेश दिले होते. त्यानुसार जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. दरम्यान, पाटील यांनी ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देईन, असे सांगितले.
मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला : कार्यकर्ते म्हणाले, ईडीकडून चुकीच्या पद्धतीने नोटीस बजावली आहे. ईडीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. तसेच प्रदेश कार्यालयाबाहेर येऊन शक्तिप्रदर्शन केले. राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त वाढवला आहे. अनेक तुकड्या येथे तैनात केल्या आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी आतमध्ये येऊ नयेत, सुरक्षा व्यवस्थेचा गोंधळ उडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भाजपाविरोधात जोरात घोषणाबाजी :राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातही या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडी आणि भाजपाविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात आहे. तर ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. ईडी भाजपच्या घरगडी प्रमाणे काम करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला. ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत पाटील म्हणाले होते की, काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं.