मुंबई - देशात रालोआचे सरकार येणार नाही, एकूणच त्रिशंकू परिस्थिती राहील. आम्हाला स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यातील सर्वाधिक जागा यावेळी मिळणार असल्याने देशाच्या राजकारणात आमच्या पक्षाचीही महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. मतदानोत्तर चाचणीनंतर माध्यमात जे चित्र रंगवले जात आहे, तशी परिस्थिती वास्तवात नाही, निकाल उद्या स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
देशात त्रिशंकू परिस्थिती आल्यास पक्षाची मोट बांधण्याचे महत्त्वाचे काम शरद पवार करतील. पवारांनी अनेक पक्षांना एकत्र आणण्याचे काम मतदानापूर्वीच केले आहे आणि आताही ते करत आहेत. यामुळे उद्या प्रत्यक्ष निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल. आम्ही पंतप्रधापदासाठी दावा करणार नसलो तरी आमची भूमिका ही महत्त्वाची असेल, असेही ते म्हणाले.
देशात त्रिशंकू स्थिती असेल, राष्ट्रवादी नाही करणार पंतप्रधापदावर दावा - नवाब मलिक राज्यात अर्ध्याहून अधिक जागा आघाडीला मिळतील. यामुळे जे एक्झिट पोल आणि अंदाज वर्तवले आहेत, ते कसेही असले तरी आमच्या पक्षाने आणि आघाडीने खूप काम केले असल्याने आम्हाला अधिक जागा मिळतील याबद्दल विश्वास असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी न्यायालयाने पहिल्यांदा व्हिव्हीपॅट स्लीप मोजायला सांगितली आहे. नंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनची मोजणी केली जावी. म्हणजे ज्या शंका होत्या त्या समजावून सांगितल्या जातील. ५ ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यात यावी, असेही न्यायलयाने स्पष्ट केले आहे. प्रश्न ईव्हीएमचा नाही, प्रश्न जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याचाही नाही तर देशात लोकशाहीप्रती विश्वास निर्माण करण्याचा आहे. जर लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे. परंतु, निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात शंका अजून वाढू लागली आहे. हे निवडणूक आयोगाला समजायला हवे, असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले आहेत.
देशात रालोआला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे त्रिशंकू लोकसभा होतील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमची मर्यादीत ताकद असल्याचे राष्ट्रवादीने वारंवार सांगितले आहे. देशात उद्या मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ होण्याची आम्हाला भीती वाटत आहे. भाजपला अपयश आले तर दंगलीही घडवू शकतील, असे आपल्याला वाटत असल्याचेही मलिक यांनी सांगितले.