महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पवार स्वत:च मैदानात, मंगळवारपासून करणार राज्यव्यापी दौरा - mumbai nes

राष्ट्रवादी काँग्रेस कडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत पवार हे सामील झाले नव्हते. त्याच पार्श्वभूमीवर पवार यांनी मराठवाडा पिंजून काढण्यासाठी हा दौरा आखला आहे.या बैठकांमधून विधानसभा निवडणुकीसाठी विविध स्तरातील उमेदवारांची चाचपणीही पवार स्वतः करणार असल्याची माहीती आहे.

शरद पवार

By

Published : Sep 14, 2019, 6:46 AM IST

Updated : Sep 14, 2019, 1:09 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पक्षांतराचे पेव फुटले आहे. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहे. १७ सप्टेंबरपासून त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात होत आहे.

पहिल्या टप्प्यात शरद पवार हे सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सध्या राष्ट्रवादीतून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हे पक्षांतर रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार हे स्वत: आता लोकांशी संवाद साधणार आहेत.

मंगळवारपासून शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा

हेही वाचा-राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे ? - बाळासाहेब थोरात

या दैऱ्यात शरद पवार हे सर्व जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करुन तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकांमधून विधानसभा निवडणुकीसाठी विविध स्तरातील उमेदवारांची चाचपणीही पवार स्वतः करणार असल्याची माहीती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेत पवार हे सामील झाले नव्हते. या दौऱ्यामध्ये ते पक्षाच्या आमदार, आजी-माजी खासदार, प्रमुख नेते, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी,आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आजी-माजी महापौर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि विविध फ्रंटल सेलचे जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आदींना ते प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सोबत चर्चा करणार असल्याचेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-सदाभाऊ खोतांची महायुतीकडे 12 जागांची मागणी; 'हे' आहेत मतदारसंघ

मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी शरद पवार हे सकाळी 11 वाजता सोलापूर येथे पहिली बैठक घेणार आहेत. त्यानंतर पुढे 70 किलोमीटरचा प्रवास करुन उस्मानाबाद येथे सायंकाळी चार वाजता विविध कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत. तर पुढे बीड येथे जाऊन मुक्काम करणार आहेत. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बीड आणि सायंकाळी पाच वाजता लातूर येथे हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याची संयुक्त बैठक घेणार असून सायंकाळी जालना येथे मुक्काम करणार आहेत. तर 20 सप्टेंबर रोजी जालना येथे सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक आणि तिथून पुढे सायंकाळी चार वाजता औरंगाबाद येथे विविध कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत. त्यानंतर त्यांचा हा मराठवाडा दौरा पूर्ण होणार आहे. 21 तारखेला ते अहमदनगर येथे सकाळी बैठक घेऊन तेथून ते बारामतीकडे रवाना होणार आहेत. तर 22 तारखेला सातारा येथे बैठक घेणार असून या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस मधून आतापर्यंत सेना-भाजपा गेलेल्या नेत्यांबद्दल चर्चा करुन त्यासाठी नवीन पर्यायही पवार सुचवणार असल्याचे सांगण्यात येते.

Last Updated : Sep 14, 2019, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details