मुंबई - राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. राष्ट्रवादीतील आमदार या पावसाळी अधिवेशनात किती आक्रमक होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे रविवारी राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी पवारांची भेट का घेतली याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
पक्ष एकसंघ राण्यासाठी विनंती - आज आमचे सर्वांचे दैवत, आमचे सर्वांचे नेते शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनजंय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झालो. शरद पवार बैठकीसाठी येथे आले असल्याचे आम्हाला समजल्यावर आम्ही त्यांच्या भेटीची वेळ न मागता त्यांच्या भेटीकरता आलो होतो. ही संधी साधून आम्ही त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र, यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीनंतर दिली आहे.
बंडखोर आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट - रविवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील तातडीने वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झाले होते.
पवारांकडे दिलगिरी व्यक्त - बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान या सर्व नेत्यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंतीही या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. हे सर्व नेते पुन्हा एकत्र आले तर आम्हाला नक्कीच आनंदच होईल, असेही पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- NCP Political Crisis : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांकडे केली दिलगिरी व्यक्त; मार्ग काढण्याची विनंती - जयंत पाटील
- Maharashtra Political crisis : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट
- Monsoon Session 2023: पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरून ठरणार वादळी; पक्षांच्या फोडाफोडीनंतर विरोधक आक्रमक