मुंबई - महाराष्ट्रात सत्तापेचातील गुंतागुंत वाढत चालली असून रेनिन्सन हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांच्या भेटीकरता सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे इतर नेते भेटले होते. उद्धव ठाकरे यांनी आमदारांना आपलीच सत्ता येणार असा विश्वासही दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनिन्सन हॉटेलवरुन हलवणार असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार रेनिन्सन हॉटेलमध्ये दाखल सर्वोच्च न्यायालयामद्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कागदपत्राची पडताळणी करण्यात यावी व अवैधरित्या हा शपथ ग्रहण सोहळा झाल्याचं या याचिकेत नोंद करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या सोमवारी सकाळी निर्णय देण्याची शक्यता असल्याने आज(रविवारी) आमदारांच्या सुरक्षेसाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पक्षप्रमुख व राष्ट्रवादीचे नेते मोठ्या संख्येने पवई रेनिन्सन हॉटेलकडे दाखल होत आहेत. अजित पवार यांच्यासोबत जे काही आमदार गेले होते त्यातील काही आमदारांनी फेसबुकवरून व्हिडिओ करून आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे त्यांनी कळवले आहे. त्यामुळे अजित पवार हे एकटेच पडले का हा प्रश्न निर्माण होतो आहे.
हेही वाचा -सुप्रिया सुळेच पवारांच्या वारसदार, दिग्विजय सिंह यांनी दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. बहुमत चाचणी केव्हा घ्यायची याचा निर्णय उद्या (सोमवार) होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून काल (शनिवार) देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याविरोधात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात रविवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणी झाली. साधारण ५५ मिनिटे चाललेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एन. व्ही रमण्णा, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी राज्यपालांनी दिलेले पत्र आणि सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चालू घडामोडी -
- पवईच्या हॉटेल रेनिन्सन मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना दुसरीकडे हलवणार.
- मुंबई जवळील ठाण्यातल्या हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच या आमदारांशी चर्चा केली होती. ज्यामध्ये आपलेच सरकार बनणार असा विश्वास त्यांनी दिला होता.
- कुठल्या हॉटेलमध्ये हलवणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
- आमदार फुटू नयेत म्हणून राष्ट्रवादीकडून प्रयत्नांची पराकाष्टा.