मुंबई :शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवल्याचा दावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ही बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बुधवारी शरद पवार आणि अजित पवार यांची समर्थकांसह बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पवारांनी पक्षातील पदाधिकारी, आमदारांसोबत चर्चा देखील सुरू केली आहे. दरम्यान शरद पवार हे बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सायंकाळी शरद पवार दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.
पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक :शरद पवार यांनी पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली आहे. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच कार्यकारिणीची कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कार्यकारिणीची कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवार यांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी या बैठकीत असतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.