मुंबई :शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. याच पद्धतीने अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगात याला आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारे कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. पक्षात राष्ट्रीय अध्यक्षांकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकार नियुक्तीचे आदेश अध्यक्ष देऊ शकतात. कार्याध्यक्ष हे नामधारी पद असल्याने त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने कोणत्याही निर्णय घेऊ नये, असे कॅव्हेटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शिंदे गटाने बंड केल्यानंतर थेट शिवसेना पक्ष आणि नावावर दावा केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले होते. सध्याची घडामोडी पाहता अजित पवारदेखील राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची शक्यता आहे. तसेच आपलाच पक्ष हा राष्ट्रवादी आहे, असा दावा केला जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन शरद पवार यांनी निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केली आहे.