मुंबईNCP political crisis :राज्यातील सत्ता संघर्षाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यांचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगा समोर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत ऑक्टोबर महिन्यात सुनावणी होणार आहे. यातच अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि युवा नेते सुरज चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संदर्भात मोठे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
31 आमदार आणि 9 मंत्री यांना शरद पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली आहे. ज्यांना नोटीस बजावली त्यातील काही आमदार आमच्या संपर्कात आहे. नोटीस बजावलेल्या आमदरांना परत पक्षात घेण्याबाबत पुनर्विचार केला जाणार नसल्याचा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर सुरज चव्हाण म्हणाले, जे अशा प्रकारे बोलत आहे, तेच आमच्या वरिष्ठांच्या थेट संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदारांचे हवं तर आपण आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेले देवगिरी आणि मंत्रालयातील कार्यालय परिसरातील फुटेज तपासू शकतात, असा दावा चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी पक्षाचा वाद निवडणूक आयोगात-शिवसेना पक्षाप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाददेखील निवडणूक आयोगात पोहोचला. दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने येणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह यावर दोन्ही गटाने दावे केले आहेत. दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडायची आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.