नवी दिल्ली :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर एनडीएमध्ये सहभागी होणे पसंत केले आहे. मात्र, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले. मात्र निवडणूक आयोगाने 'खरा बॉस' कोण आहे, याची शहानिशा करण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचेही निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
- निवडणूक आयोगाने बजावल्या होत्या नोटीस : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. शरद पवार यांच्या या पत्रामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 27 जुलैला नोटीस बजावत कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते.
अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा प्रस्ताव :निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना 27 जुलैला नोटीस बजावल्यानंतर दोन्ही गटांनी कागदपत्रे सादर केली होती. अजित पवार गटाने तर निवडणूक आयोगाकडे 40 आमदार, खासदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांची यादीच सादर केली होती. यावेळी बंडखोरांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याचा प्रस्तावही सादर केला होता. त्यामुळे शरद पवार गटाची मोठी कोंडी झाली होती.