मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मंगळवारी प्रथमच 'स्वातंत्र्य दिन' दोन्ही गटाच्या मुख्य कार्यालयासमोर ध्वजारोहण करुन साजरा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या संबोधनात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोला लगावला होता. याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सगळ्या पक्षात घराणेशाही : लाल किल्ला येथे केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी घराणेशाहीवर भाष्य केले आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहेच. मी संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण ऐकले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की, जर एक बोट दुसऱ्याकडे दाखवले तर तीन बोटे आपल्याकडे असतात. भाजपात देखील घराण्यातील लोकं निवडून आलेले आहेत. दुसऱ्या पक्षात असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र, ते नेते आज भाजपात आहेत. भाजपामध्ये याबाबत स्पष्टता नाही.
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि द्वेषभावना याविषयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. त्यामुळे भाजापातही घराणेशाही चालत आहे. त्यामुळे ही घराणेशाही सर्वच पक्षात आहे - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी
शरद पवारांनी संभ्रम दूर केला : दररोज नवीन संभ्रम आणि बातम्या येत आहेत. शरद पवार यांची सांगोल्यातील सभा आणि त्यानंतरची पत्रकार परिषद पाहिली तर सध्या निर्माण झालेला संभ्रम पूर्णपणे दूर होईल. आपल्याला कुणाशी वैयक्तीक लढायचे नाही. आपली वैचारिक लढाई आहे. समोरच्या लोकांच्या मनात संभ्रम असल्यामुळेच अधिक संभ्रम निर्माण होत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.