मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाणे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, बरोरांनी हातात शिवबंधन बांधले आहे.
पांडुरंग बरोरांचा शिवसेना प्रवेश हा ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे.
आमदार पांडुरंग बरोरा अडकले शिवबंधनात शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज सिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पालघर व शहापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यांच्यासोबतच पालघर जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे व काँग्रेसचे माजी युवा अध्यक्ष आनंद दुबे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
शहापूर तालुका भगवामय करणार
येणाऱ्या काळात शहापूर तालुका भगवामय करणार असल्याचे वक्तव्य आमदार पांडुरंग बरोरा यांनी केले. २० वर्षात जेवढा विकासनिधी मिळाला नाही, तेवढा निधी या ५ वर्षात मिळाल्याचे बरोरांनी यावेळी सांगितले. शहापूर तालुक्याची पाणीटंचाईचा मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदारसंघात अनेक कामे केल्याचेही ते यावेळी म्हणाले. मतदारसंघात बेरोजगारी, क्रिडा संकूलाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न युती सरकारच्या माध्यमातून सुटतील असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरणा मिळत होती, मात्र आमच्या तीन पिढया शरद पवार यांच्यासोबत होत्या.अखेर बदल हवा म्हणून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. भिवंडी पुरता शहराचा विकास न करता तो शहापूर पर्यंत करण्यात यावा.
वेगळा पांडुरंग शिवसेनेत आला - उद्धव ठाकरे
सर्व पांडुरंगाच्या दर्शनाला चालले आहेत, मात्र, हा वेगळा पांडुरंग आमच्याकडे आला आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पांडुरंग बरोरा यांचे स्वागत केले. निवडणूक आल्याने लोक पक्ष बदलतात, पण ही माणसे कोणतेही प्रलोभन न घेता शिवसेनेत आले आहेत. शहापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न आम्ही सोडवणार हा विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कित्येक लाटा आल्या आणि गेल्या तरी ठाणे जिल्हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. लोकांचा शिवसेनेप्रती विश्वास वाढत असल्याने यश मिळत आहे. त्यामुळे वाटेल ते करू या असे होणार नसल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.