मुंबई :शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना विभागवार चर्चा कशी करावी, याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्या आमदाराने कोणत्या विभागाच्या मुद्द्यांच्या चर्चेमध्ये सहभाग घ्यावा, याबाबत या बैठकीतून सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आमदारांना केल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दे चर्चा कशी करावी? मुद्द्यांची मांडणी प्रत्येक आमदारांनी कशी करावी? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सर्व आमदारांना सूचना केल्या असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रथम अनिल पाटील यांनी दिली आहे. प्रत्येक आमदारांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित केले? आपल्या भागातील कोणत्या समस्या मांडल्या त्या मांडताना कशाप्रकारे आकडेवारी सादर केली? या सर्वांचे निरीक्षण अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले जाणार आहे.
पोट निवडणूकीसाठी आमदारांना खास जबाबदारी :कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीत प्रत्येक आमदाराला खास जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराला प्रचारासाठी विभागवार जबाबदारी या बैठकीतून देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ हा पुण्यातील शहरी भागातला मतदारसंघ आहे.
प्रचार करण्याची विशेष जबाबदारी :प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील आमदारांचा वर्गीकरण करण्यात आले आहे. या मतदारसंघात त्यांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यातील असलेल्या मतदारांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आपला संपर्क ठेवायचा आहे. यासाठी प्रत्येक आमदाराला वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रचार करताना या प्रत्येक आमदारांना त्यांच्या तालुका आणि जिल्ह्यातील नागरिकांकडे प्रचार करण्याची विशेष जबाबदारी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत या दोन्हीही जागा जिंकून आणण्यासाठी या शिबिरातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकत लावली आहे.
आमदारांनी निवडणूकीसाठी तयार राहण्याच्या सूचना :कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या केवळ पोट निवडणुकांपुरते मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पुढील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या शिबिरातून सर्व आमदारांना केल्या आहेत. प्रत्येक आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी रणशिंग फुंकली आहेत.
हेही वाचवा : Ashok Chavan Reaction : थोरातांचे 'ते' पत्र पटोलेंनी नाही पाहिलं! नाना पटोलेंच्या मदतीला धावले अशोक चव्हाण