मुंबई - पर्यावरणप्रेमी, आरेतील आदिवासी आणि मुंबईकरांनी मागील सात वर्षांपासून सुरू केलेल्या मेट्रो-3च्या कारशेड विरोधातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. मागील सरकारने पर्यावरण नियम धाब्यावर बसवून आरेमध्ये मेट्रो-3 चा कारशेड आणला होता. आता तो कारशेड कांजूरमार्ग येथे असलेल्या खार पट्ट्यातील जमिनीवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी, आरेतील आदिवासी आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांनीही मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. यामुळे मुंबईकरांचे हृदय म्हणून ओळखले जाणारे आरे आणि येथील जंगल अबाधित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता मेट्रो- ३चे कारशेड हे कांजूरमार्ग येथे असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या शेजारी उभे राहणार आहे. ही जागा फडणवीस सरकारच्या काळात ही निश्चित झाली होती. मात्र, त्या वेळेस सरकार तत्कालीन सरकारने या जागेकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात रेटून नेलेल्या या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने बदलण्याचा मोठा निर्णय घेतल्याने भाजपालाही हा मोठा धक्का दिला असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे मध्ये मेट्रो-3चे कारशेड करण्याचा निर्णय रेटून नेला होता. याच कारशेडसाठी पर्यावरणप्रेमींनी शेकडो वेळा आंदोलने करून हा विषय चर्चेत ठेवला होता. यासाठी अनेक साहित्यिक पर्यावरणप्रेमी चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवर यांनीही आरे वाचवण्याच्या या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला होता. मेट्रो-3साठी सुरुवातीला मॅडम कांजूरमार्ग आणि गोरेगाव आदी ठिकाणातील जागाही समोर आल्या होत्या. मात्र, मेट्रो-३च्या कार शेडचा निर्णय पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक आदिवासींच्या विरोधानंतरही कायम ठेवला होता. यामुळे पर्यावरण प्रेमींनी आंदोलनात सोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. याच पार्श्वभूमीवर मेट्रो आणि संबंधित कामकाज पाहणाऱ्या एमएमआरडीएने येथील हे मेट्रो-3चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे मुंबईचा हृदय म्हणून समजले गेलेल्या आरेतील पर्यावरण अबाधित राहण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीकडून आरे वाचवण्यासाठी मेट्रो-3च्या कारशेडला कांजूरमार्ग येथे हलविताना त्यासाठी लागणारी खार पट्ट्यातील जमीन अगदी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.