महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवारांचे 'युवा शिलेदार' राष्ट्रवादीला संजीवनी देतील काय? - विधानसभा निवडणूक २०१९

पवारांनी प्रचारासाठी काही नवे चेहरे पुढे आणले आहेत. ते आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. हे नवे चेहरे राष्ट्रवादीला संजीवनी देतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादीचे 'युवा शिलेदार'

By

Published : Sep 22, 2019, 4:27 PM IST

मुंबई - शनिवारपासून राज्यभर विधानसभा निवडणुकासाठी आचारसहिंता लागू झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी गुडघ्याला बाशिंग बाधले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. तसेच पवारांनी प्रचारासाठी काही नवे चेहरे पुढे आणले आहेत. ते आक्रमकपणे पक्षाची भूमिका मांडत सतत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. हे नवे चेहरे राष्ट्रवादीला संजीवनी देतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महाराष्ट्र विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा, शिवसेनेने जनआशिर्वाद यात्रा, राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढत राज्यभर वातावरण निर्मिती केली आहे. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत आहे. राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातच शरद पवार पायाला भिंगरी बांधून राज्यात फिरत आहेत. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसला संजवनी देण्यासाठी पवारांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना मैदानात उतरवलंय. हे राष्ट्रवादीचे युवा चेहरे सध्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत.

हेही वाचा - भाजपच्या ‘दृष्टीपत्रावर' एक दृष्टीक्षेप..!

हेही वाचा - आमदार शिंदेंचा पत्ता होणार कट? माढ्यात राष्ट्रवादीचा नवा 'शिलेदार' कोण?


धनंजय मुंडे
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा आणि अभ्यासू मांडणी करणार नेते अशी त्यांची ओळख आहे. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच पोल खोल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे महाराष्ट्रभर प्रचार दौरे करत आहेत. त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. भाजप सरकारला मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नसल्याचेही धनंजय मुंडे सांगत आहेत.


खासदार अमोल कोल्हे
२०१९ च्या लोकसभा निवडणकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वाची मानली जात होती. सलग ३ वेळेस शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा डॉ. अमोल कोल्हेंनी पराभव करून शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून अमोल कोल्हेंनी घराघरात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची सध्या क्रेझ आहे. राष्ट्रवादीचे तेही स्टार प्रचारक आहेत. सध्या आक्रमकपणे ते पक्षाची बाजू मांडत असून, विरोधकांना लक्ष्य करत आहेत.


अमोल मिटकरी
नव्यानेच पक्षात दाखल झालेले अमोल मिटकरी हे सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादीचा युवा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शाहू-फुले-आंबेडकरांच्या कार्यावर व्याख्यान देणारे मिटकरी सध्या राष्ट्रवादीचे प्रमुख प्रचारक आहेत. तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेझ आहे. त्यांच्या भाषणांना आता लोक गर्दी करत आहेत. त्यांच्या आक्रमक शैलीचा विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कितपत फायद होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


मेहबूब शेख
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष मेहबूब शेख हे सध्या चांगलेचे चर्चेत आले आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलने करून त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते युवकांशी संवाद साधतायेत. पक्षाची भूमिका समजावून सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा पक्षाला कितपत फायदा होतो हेही पाहणे गरजेचे आहे.

याबरोबरच राष्ट्रवादीमध्ये आक्रमक चेहरे म्हणून बीडचे संदिप क्षीरसागर, युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर, मनाली भिलारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे अजिंक्यराणा पाटील, विजयसिंह पंडीत, रोहित पवार हे सुद्धा आक्रमकपणे पक्षाची भूमिक मांडत आहेत.


युवा वर्गात आकर्षण
हे युवा चेहरे तरुणांच्या आकर्षण ठरत आहेत. या सर्वांच्या सभेला मोठी गर्दी होत आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात तरुणांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

जातीय समिकरणे
अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी आणि मेहबूब शेख हे युवा चेहरे पुढे आणण्यात राष्ट्रवादीने जातीय समीकरणाचे गणित आखल्याचे दिसते. राष्ट्रवादी एक सर्वसमावेशक पक्ष अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा फळी मैदानात उतरली आहे. विधानसभा निवडणुकीत हे युवा चेहरे कितपत प्रभावी ठरतायेत हे पाहावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details