महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शरद' नावाच्या वटवृक्षाची 'ही' आहेत 'पॉवर'फूल 'मूळं' - devendrafadnavis

पवारांकडून आम्हाला भरपूर काही मिळाले. ते आमच्या कायम ह्रदयात राहतील मात्र, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, असे, म्हणत अनेकांनी भाजप-सेनेत प्रवेश केला. अशा कठीण प्रसंगी ही शरद पवारांनी घडविलेले बरेच नेते अजूनही पवारांसोबतच भक्कमपणे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

शरद पवार आणि त्यांचे नेते

By

Published : Sep 26, 2019, 1:04 PM IST

Updated : Sep 26, 2019, 1:23 PM IST

मुंबई- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठे यश मिळाले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आणखीन बिकट होईल, या भीतीने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. पवारांकडून आम्हाला भरपूर काही मिळाले. ते आमच्या कायम ह्रदयात राहतील मात्र, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, असे, म्हणत अनेकांनी भाजप-सेनेत प्रवेश केला. अशा कठीण प्रसंगीही शरद पवारांनी घडविलेले बरेच नेते अजूनही पवारांसोबतच भक्कमपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.


दिलीप वळसे-पाटील-

दिलीप वळसे-पाटील

१९८० साली ६० आमदार पवारांची साथ सोडून गेले होते. पवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. त्याच वेळी त्यांच्या बरोबर सावली प्रमाणे वावरले ते दिलीप वळसे पाटील. वळसे-पाटलांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. पवारांसोबत काम करत असतानाच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. तसेच, राज्यभर फिरून त्यांनी महाराष्ट्रही जाणून घेतला. नंतर १९९० साली आंबेगाव तालुक्‍याचे युवकांचे नेतृत्व म्हणून वळसे-पाटलांचा उदय झाला.

वडील सहकारमहर्षी दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून वळसे-पाटील यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पराभूत केला. त्यानंतर आजपर्यंत सलग पाचवेळेस त्यांनी विजय मिळवला. युती सरकारच्या काळात विरोधीपक्षातील त्यांचे काम लक्षवेधी होते. म्हणूनच आघाडी सरकार आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचे बक्षिस मिळाले होते.


जितेंद्र आव्हाड-

जितेंद्र आव्हाड

वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पालापाचोळ्याची फिकीर नाही. इथे नव्या पालवीला जन्म घालणारा महावृक्ष आहे. असे म्हणत आव्हाड शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे आहेत. राष्ट्रवादीची धडाडती तोफ म्हणून जितेंद्र आव्हाड यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. वंचित उपेक्षितांच्या तळमळीतून त्यांचे राजकारण उदयास आले. सामान्य कुटुंबातून येऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते पहिले राष्ट्रीय अध्यक्ष झाले. पवारांबाबत प्रचंड प्रेम आणि आदर असणाऱ्या नेत्यांमध्ये आव्हाडांचे नाव अग्रस्थानी आहे. "काहीही करेन पण पवारांना सोडणार नाही " असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.

२००९ पासून जितेंद्र आव्हाड कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्या आधी त्यांनी विधानपरिषदेवरही काम केले आहे. २०१४ च्या मोदी लाटेतही तब्बल ४७ हजारांच्या मताधिक्क्याने ते निवडून आले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. जितेंद्र आव्हाड हे १९८८ पासून शरद पवारांसोबत आहेत.


हसन मुश्रीफ-

हसन मुश्रीफ

एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोमात गेली आहे. हसन मुश्रीफांनी सुरुवातीपासूनच "पवार एके पवार" हे तत्व जोपासले आहे. सामाजिक भान असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. ते कोल्हापुरातील कागल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातले मोठे नाव असून शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. म्हणूनच काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र, मुश्रीफांनी पवारांवरची निष्ठा दाखवत ती साफ धुडकावून लावली. त्यानंतर त्यांच्या घरावर तसेच, कारखान्यांवर धाडी पडल्या होत्या. राष्ट्रवादीचा मोठा मुस्लीम चेहरा म्हणून हसन मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी कामगार खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते.


बाबाजानी दुर्रानी-

बाबाजानी दुर्रानी

बाबाजानी १९७८ पासून शरद पवारांसोबत आहेत. पवार देतील तो आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी आतापर्यंत पक्षाची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली आहे. परभणी जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. पवारांनीही त्यांच्या निष्ठेचा योग्य तो सन्मान राखत त्यांनी विविध पदे भूषवण्याची संधी दिली आहे. २००९ साली विधानसभेला पराभूत झाल्यानंतर पवारांनी त्यांना विधानपरिषदेत संधी दिली होती.


छगन भुजबळ-

छगन भुजबळ

भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले. त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1999 साली आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना उपमुख्यमंत्रीपदा बरोबरच गृह मंत्रालय देण्यात आले. सत्तेत नेहमीच भुजबळांना महत्वाची पदे देण्यात आली.

२०१४ साली मोदी लाटेत आघाडीचे सरकार जाऊन सेना- भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दिला गृहण लागले. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली. ते सध्या जामिनावर सुटलेले आहेत. तुरुंगातून आल्यानंतर तेही पक्ष सोडतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी शरद पवारांबरोबरच रहाण्याचा निर्णय घेतला. सध्या भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशा अनेक बातम्या आल्या मात्र, भुजबळांनी त्या सर्व अफवा असल्याचे सांगितले.


जयंत पाटील-

जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते. सहकारमहर्षी राजारामबापू पाटील यांचे पुत्र. भाजप सरकार विरोधात ते सद्या दोन हात करत आहेत. पवारांच्या खाद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. १९९० पासून ते सतत विधानसभेवर निवडून येत आहेत. आघाडी सरकार काळात त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि ग्रामविकासमंत्री म्हणून काम केले आहे. पवारांच्या संघर्षाच्या काळात पाटील त्यांच्या बरोबर सावली प्रमाणे आहेत.

Last Updated : Sep 26, 2019, 1:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details