मुंबई - भाजपच्या गोटात गेलेले राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि त्यांचे निकटवर्तीय प्रयत्न करत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी अजित पवार भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. मनधरणी करून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याचे आवाहनही केले. मात्र त्याला अजित पवार यांनी प्रतिसाद न दिल्याने या नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. तोच प्रयत्न आज(24 नोव्हेंबर) सकाळपासून पुन्हा एकदा सुरू झाला आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार विलास लांडे यांनी पवार यांची भेट घेतली. पुन्हा एकदा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यात आपल्याला बरेच यश आले असून अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत येतील, असा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला आहे.