मुंबई :शिवसेनेत जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन मोठे बंड केले. त्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला. आयोगाने देखील पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. सध्या शिवसेनेची वाताहत झालेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार बंडाच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे चर्चा रंगली होती. चाळीस आमदारांना अजित पवार यांनी मुंबईत बोलावून घेतल्याचे वृत्त प्रसारित होताच, राजकारणात नव्या समीकरणाची जोरदार चर्चा झाली. मंगळवारी दिवसभरात मोठ्या घडामोडी झाल्या. अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार असल्याचे सांगत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.
आमदारांची मुंबई बैठक घेतली जाणार : तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना उघडपणे पाठिंबा दिला. त्यामुळे अजित पवारांच्या बंडाला बळ मिळत असल्याचे समोर आले. या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत बाजू सावरली. मात्र, पक्षांतर्गत बंडाच्या चर्चावर सर्वच आमदारांना फोनाफोनी करत चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत सर्व आमदारांची मुंबई बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अजित पवार यांच्याकडून बंडाबाबत मत विचारात घेतले जाणार आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे समजते.
Sharad Pawar News: पक्षांतर्गत बंड रोखण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली; आमदारांना फोन करून पक्षातील चाचपणीला सुरुवात
शिवसेना फुटीनंतर आता रंगलेल्या अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चेनंतर जवळपास ४० हुन अधिक आमदारांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला. पक्षांतर्गत बंड रोखण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर बंडाला पाठिंबा देणाऱ्या सर्वच आमदारांना फोन करून पक्षातील चाचपणीला सुरुवात केल्याचे समजते.
राज्यातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे भाष्य : अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला जपानचा दौरा रद्द करत मुंबईत तळ ठोकला. दिवसभर राहुल नार्वेकर हे विधानभवनात बसून होते. दुपारनंतर अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिल्यानंतर ही राजकीय घडामोडी आणि उलथापालथ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने नार्वेकर विधान भवनात बसले होते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या कामकाजाचा प्रलंबित कारभार पूर्ण करण्याच्या लगबगीत असल्याचा फोटो ट्विट केला. राज्यातील घडामोडींवर अप्रत्यक्षपणे भाष्य हा फोटो असल्याच्या प्रतिक्रिया दिवसभर राजकीय वर्तुळात उमटत होत्या.