महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांकडून माहिती

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत प्रकरण यासोबत राजकीय नेत्यांना आलेले धमकीचे फोन, या सर्व घडामोडींनी महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या सर्व प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली.

ncp leader sharad pawar Discussion with mumbai police commissioner paramvir singh in mumbai
मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेची पवारांनी घेतली पोलीस आयुक्तांकडून माहिती

By

Published : Sep 10, 2020, 1:49 PM IST

मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रणौत प्रकरण आणि राजकीय नेत्यांना आलेले धमकीचे फोन, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या २० मिनिटांच्या या चर्चेत पवार यांनी सर्व प्रकरणाची माहिती घेतल्याचे समजते.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत प्रकरण यासोबत राजकीय नेत्यांना आलेले धमकीचे फोन, या सर्व घडामोडींनी महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या सर्व प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी आयुक्त परमवीर सिंग यांच्याशी चर्चा केली. कंगना प्रकरणाच्या माध्यमातून सोशल मीडियावर घडत असलेल्या घडामोडी, शिवसेना, भाजपा या राजकीय पक्षांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा कोणता प्रश्न निर्माण झाला आहे, या संदर्भातील माहिती आयुक्तांनी पवारांना दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

याशिवाय कंगना रणौत विषयावरून भाजपाकडून विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे. यात कंगनाच्या मुंबई विरोधातील विधानाचे जाहीर समर्थन केले जाते, यावरही मुंबई पोलीस लक्ष देऊन असल्याची माहिती आयुक्तांनी पवारांना दिली असल्याचे कळते.

मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देण्याचा फोन आला होता. त्या सोबतच शरद पवार आदी नेत्यांनाही अशा प्रकारचे फोन आले होते, त्या संदर्भातील पुढील कार्यवाही काय सुरु आहे, याची माहिती पवारांनी आयुक्तांकडून घेतली असल्याचे समजते. दरम्यान, पवार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना 'आस्ते घ्या.. भावनिक होवू नका. तुम्हाला उचकवण्यचा प्रयत्न सुरू आहे, त्याला बळी पडू नका,' अशा सूचना दिल्या असल्याचेही बोलले जात आहे.


हेही वाचा -सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकून शिवसेना आता 'सोनिया सेना' झालीय - कंगना

ABOUT THE AUTHOR

...view details