मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या संदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांच्याकडे मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आपण राज्य लोकसेवा आयोगाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री यादोघांनीही चर्चा केली. या दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसारच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता म्हणून आपण यात बोललो, मात्र या बाबतीतले कोणतेही श्रेय घेण्याचा आपला विचार नाही. आपल्याला श्रेय नको आहे, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.
भाजपाकडून जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न :पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड या मतदारसंघांमध्ये होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्या चार दिवसांपासून तळ ठोकून आहेत. तसेच या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना दुबईतून बोलावण्यात येत आहे. असा प्रचार सुरू झाल्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, जर मतदार काही कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असेल, मग तो काठमांडूला असेल दुबईला असेल व अन्य ठिकाणी असेल त्याने मतदानासाठी यावे, असे जर कोणी आवाहन करत असेल तर त्यात गैर काय आहे? मात्र अपयश समोर दिसू लागले. पराभव समोर दिसू लागला की, भाजपाच्या वतीने नेहमीच निवडणुकांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे आताही जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माकडे जातीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला. सरकारकडून जे काम अपेक्षित आहे ते काम होत नाही, म्हणून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रकार केले जातात, असेही शरद पवार म्हणाले.
भावी मुख्यमंत्री पोस्टर लावणे पोरकटपणा :कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकण्यासाठी काही उमेदवारांकडून प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे. यापूर्वी एवढे अर्थकारण कधीच निवडणुकीत पाहिले नव्हते, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. एकाच पक्षातील तीन नेते जयंत पाटील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले गेले आहेत. या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, हा केवळ पोरकटपणा आहे. कुणीतरी केलेला हा खोडसाळपणा आहे. एकाच पक्षातील त्यातही एकाच घरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्री पदासाठी दाखवणे हे आश्चर्य आहे. अशा पद्धतीची कोणतीही चर्चा अथवा प्रयत्न पक्षाकडून केले जात नाही, हा निव्वळ पोरकटपणा आहे असेही त्यांनी सांगितले.