महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil Letter To CM: पुरोगामी महाराष्ट्रात दंगली, कायदा सुव्यवस्थेबाबत जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खाते नक्की काय करते, असा प्रश्न सामान्यांना पडल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

Jayant Patil Letter To CM
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

By

Published : Jun 17, 2023, 4:11 PM IST

Updated : Jun 17, 2023, 4:30 PM IST

मुंबई: महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढत चाललेले आहे. राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नेमके कोणती कारवाई करत आहे? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात प्रकाश टाकणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष पसरवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार, काही सामाजिक तत्व करत आहे. अशा व्यक्तींवर कारवाई होत नाही.




महिला, मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले : मुंबई चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात घडलेली मुलीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांनवर होणाऱ्या अत्याचार तसेच त्यांचे गायब होण्याचे प्रमाण देखील गेल्या काही दिवसात वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करुन सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे, अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार काम करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेला खतपाणी मिळत आहे.



जयंत पाटील यांनी व्यक्त केली आशा : काही प्रकारांमुळे राज्यातील सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी आशा जयंत पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

पाच महिलांबाबत लैंगिक छेडछाड :दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार, बलात्कार, खून अशी प्रकरणे वाढतच चालली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक येथे आरोपी नवाजु शेख याने एक नाही तर, इतर चार अशा एकूण पाच महिलांबाबत लैंगिक छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित तरुणी परीक्षेला जात असताना तिच्यावर हा प्रसंग ओढावला होता. आरोपीला घटनेनंतर चार तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली होती. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान 14 जूनला सकाळी 7.28 वाजता हा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Last Updated : Jun 17, 2023, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details