मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, अजित पवारांनी राजीनामा का दिला? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जाणून घेऊया नेमका अजित पवारांनी का दिला राजीनामा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मेगा गळती लागली आहे. अशातच अचानक पवारांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीमध्ये आणि राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
ही असू शकतात कारणे
कौटुंबीक भांडण
गेल्या अनेक दिवसांपासून पवार यांच्या घरात कौटुंबीक वाद असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकवाक्यता नसल्याचे बऱ्याच वेळेला दिसून आले होते. राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे हे सुध्दा कारण असू शकते.
शरद पवार एकटेच ईडी कार्यालयात कसे गेले
शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. आज (शुक्रवारी) शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतर पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. मात्र, पवारांनी एकट्यानेच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय कसा घेतला. अजित पवार यांच्यावर सुद्धा ईडीने गुन्हा दाखल केला होता. मात्र, आज ते कुठे दिसले नाहीत.
झेंड्यावरुन पक्षात दुमत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावरुन पक्षात दुमत असल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर आता भगवा झेंडाही फडकवला जाईल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचे कोणी जाहीर समर्थन करताना दिसले नाही. अजित पवार यांचे ते वैयक्तीक मत असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. यावरुनही अजित पवार नाराज असल्याची माहिती मिळते आहे.