मुंबई- शिवसेनेमार्फत पीक विम्यासंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच हा मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांवर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.
नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात, हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज असल्याचा टोला देखील जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
शिवसेनेचा मोर्चा -
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत विमा कंपन्यांच्याविरोधात आज मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक विषय घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज रस्त्यावर उतरले होते. 'भारती एक्सा' या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी 15 दिवसात कर्जमाफीचे, पीक विम्यांचे सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा अल्टिमेटम बँकांना व पीक विमा कंपन्यांना दिला. तसेच ज्यांचे अन्न खातो त्याला जागतो, असे म्हणत शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान जंयत पाटील यांनी याच मोर्चावरून शिवसेनेवर टीका केली.