मुंबई/नवी दिल्ली NCP Hearing :अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडं असून यावर आज (शुक्रवार ६ ऑक्टोबर) सुनावणी झाली. या सुनावणीसाठी शरद पवारांनी निवडणूक आयोगात हजेरी लावली होती. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून तब्बल दोन तास युक्तिवाद झाला. आता पुढील सुनावणी सोमवारी चार वाजता होणार आहे.
अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर : सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रं सादर करण्यात आल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. 'सुमारे दोन तास सुनावणी सुरू होती. आमचं म्हणणं ऐकून न घेता पक्षात वाद आहे हे सिद्ध करू नका, असं आम्ही म्हटलं. दुसऱ्या गटाचा युक्तीवाद संपल्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळेल. अजित पवार गटाकडून अनेक खोटी कागदपत्रं सादर करण्यात आली. मृत व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. आम्ही पुरावे दिले आहेत. पुढे सुनावणीच्या वेळी आणखी पुरावे देऊ. शरद पवारच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत', असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.
शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत शरद पवार गट आक्रमक झाला आहे. एका बाजूला पक्ष आणि चिन्ह कोणाचं या संदर्भातली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. तर दुसरीकडे, शरद पवार गटानं अजित पवार गटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी विनंती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत केली. या याचिकेवर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.