मुंबई- राज्यातील तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही यासाठीची मुदत १ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहे. या अर्जांची छाननी ३ जुलै रोजी होऊन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार आहे, असेही सांगण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये संबंधित जिल्हाध्यक्षांकडेही सादर करता येवू शकतो किंवा पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाईनवरही अर्ज स्वीकारले जातील, असेही पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदींसह इतर वरीष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते.
यावेळी राज्यातील सर्व जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये शरद पवारांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच त्या त्या जिल्ह्याचा आढावाही घेण्यात आला.
राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी, ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज १ जुलै २०१९ पर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात किंवा जिल्हाध्यक्ष व पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.