मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी 77 जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत तब्बल 35 नवे चेहरे राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. तर मागील निवडणुकीमध्ये केवळ दोन ते चार हजार मतांच्या फरकाने आणि त्याहून अधिक मताने पराभव झालेल्या तब्बल 22 जणांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे.

हे ही वाचा -राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 19 विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यात पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके यांची भर पडली असल्याने एकूण 20 विद्यमान आमदार राष्ट्रवादी कडून पहिल्या उमेदवारी यादीत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळीतून मैदानात उतरले आहे. तर आदिती ठाकरे यांना श्रीवर्धन मधून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये मागील अनेक वर्षांपासून खासदार आणि आमदार अशा विविध पदासाठी उमेदवारी मिळवलेल्या संजय दिना पाटील यांचा मात्र यावेळी पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी मुंबईत धनंजय पिसाळ या नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सदस्य विद्या चव्हाण यांना दिंडोशी मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक पुन्हा एकदा अनुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार असून त्यांचे नाव या पहिल्या यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कडून तिकीट नाकारण्यात आले होते. परंतु यावेळी त्यांना सिंदखेडराजा येथून पुन्हा उमेदवारी दिली आहे.
हे ही वाचा -भाजपची १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, खडसे-तावडे यांचे नाव नाही