मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे भाजप सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सरकारमध्ये सहभागी : सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते भाजपसोबत कधीही जाऊ शकतात, असे सांगण्यात आले. मला पक्षाची जबाबदारी द्या, विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा आशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. परंतु पक्षाकडून कोणताही निर्णय न झाल्याने अजित पवार नाराज झाले असून आता ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद :आता शरद पवार थोड्याच वेळात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमीक स्पष्ट करणार आहेत. नेमके शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देता ते पहावे लागणार आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया देणार आहे. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाती शपथ घेतली आहे. महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. मात्र, या राजकीय घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार नाराज :मागील काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात काही नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे मात्र कोणतीच नवीन जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे मोठे कारण समजले जात होते.
पहाटे जाऊन शपथविधी घेतला :अजित पवार हे 2019 पासूनच पक्षावर नाराज आहेत 2019 मध्ये अजित पवार यांनी पक्षाच्या सांगण्यावरूनच सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे जाऊन शपथविधी घेतला मात्र त्यानंतर शरद पवार यांनी भूमिका बदलत शिवसेने सोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांना मान्य नसतानाही शरद पवार यांच्या भूमिकेनुसार मंत्रिपदाचा राजीनामा देऊन शिवसेने सोबतच्या सरकारमध्ये सामील व्हावे लागले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट :त्यानंतर पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट अशी विभागणी झाली पक्षाची सूत्रे आपल्याकडे असायला हवीत असे सातत्याने अजित पवार यांना वाटत होते मात्र जयंत पाटील यांच्याकडून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली नाहीत. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी राजीनामा देत पक्षाची धुरा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवावी असा निर्णय झाला असताना अचानक शरद पवार यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली अजित पवार यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे येतील अशी चर्चा असताना त्याबाबत निर्णय झाला नाही यामुळे ही अजित पवार नाराज झाले.
अखेरीस पक्षाबद्दलची नाराजी :अजित पवार यांच्या संबंधित सहकारी साखर कारखान्यांवर केंद्रीय यंत्रणांनी दबाव टाकत वाढता ससेविरा लावला होता या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना काही निर्णय घेणे भाग होते अखेरीस पक्षाबद्दलची नाराजी आणि केंद्रीय यंत्रणांचा वाढता दबाव यातूनच अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषण आनंद गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.