मुंबई :10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण होऊन पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्या दिवशी सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयाबाहेर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या वाटचालीत राष्ट्रवादीने केंद्र असो किंवा राज्यातील सत्ता, नेहमीच महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
केडगाव येथील कार्यक्रम पुढे ढकलला : चालू वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे. या आधी वर्धापन दिनाचा कार्यक्रम अहमदनगर मधील केडगाव येथे आयोजित करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पक्षाचे नेते मोठ्या जोमाने कामाला लागले होते. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडल वरून कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सामील होण्याबाबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता. मात्र हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
स्थापनेपासून कायमच सत्तेच्या आसपास राहिला आहे : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक वेगळे स्थान आहे. स्थापनेपासून हा पक्ष कायमच राज्यातील सत्ताकारणारच्या केंद्रस्थानी राहिला आहे. 1999 पासून 2014 पर्यंत हा पक्ष कॉंग्रेस सोबत सत्तेत राहिला. 2014 ते 2019 हे पाच वर्ष सोडले असता पुन्हा 2019 मध्ये हा पक्ष महाविकास आघाडी सोबत सत्तेत आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. महाविकास आघाडीतही हा पक्ष कायमच केंद्रस्थानी राहिला.