मुंबई - महाराष्ट्रात आज राजकीय भूंकप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेचा हा धक्का आता शिवसेना कसा पचवणार यासह यावर सेनेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकार स्थापनेमध्ये शरद पवारांचा सहभाग - सूत्र
भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेला शरद पवारांची सहमती असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या आधारे दिली आहे.
राजभवनात शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फडणवीस आणि अजित पवारांना शपथ दिली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल यासाठी विविध बैठका पार पडल्या. अनेकदा दिग्गज नेत्यांमध्ये एकमत नसल्याचेही दिसून आले. मात्र हळूहळू चित्र स्पष्ट झाले आणि मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती समोर आली. मात्र, आज पार पडलेल्या शपधविधीमुळे राष्ट्रवादीचे हे धक्कातंत्र शिवसेनेला पचवणे किती अवघड जाणार यावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
मुरब्बी राजकारणी शरद पवार यांचा सरकार स्थापनेमध्ये सहभाग असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेससह आतापर्यंत झालेल्या चर्चा अपयशी ठरल्या असे स्पष्ट होत आहे. महाआघाडीमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद टोकाला गेले असल्याची चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये केली जात आहे. साताऱ्यात भरपावसात चिंब भिजत शरद पवारांनी जोरदार भाषण दिले होते. या एका भाषणाने महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे चित्र पालटले, असा राजकीय विश्लेषकांना अंदाज आहे. आता पुन्हा एकदा सरकार स्थापनेमध्ये त्यांचाही सहभाग असल्याने पवार यांची पावर पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली असल्याचे सूर उमटत आहेत.